वैष्णवी शांत वयाची पन्नास वर्षे पूर्ण झाल्यानंतर करतात. ही शांत का करावी याची माहिती वयोवस्था शांती या विषयामध्ये दिली आहे. यजमान सपत्नीक बसून कुलदेवता, वडिलधारी मंडळी यांचे आशीर्वाद घेऊन कार्याला प्रारंभ करतात. गुरूजी संकल्प सांगतात त्याचा भावार्थ असा आहे की आता उर्वरीत आयुष्यामध्ये नानाप्रकारचे रोग, ग्रहपीडा यांचा नाश होऊन मला व माझ्या कुटुंबाला सुख, शांतता प्राप्त होण्याच्या उद्देशाने वैष्णवी शांती करतो. संकल्प करून झाल्यानंतर गणेशपूजन, पुण्याहवाचन, मातृकापूजन, नांदीश्राद्ध हे विधी केले जातात. हे सर्व विषय जवळपास सर्व कार्यामध्ये येत असल्यामुळे याची सविस्तर माहिती वेगळी दिलेली आहे. यानंतर गुरूजी पिवळी मोहरी, पंचगव्य, शुद्धपाणी शिंपडून गृहशुद्धी करतात. या शांतीची मुख्यदेवता विष्णू आहे त्याची स्थापना करण्यासाठी शक्य असल्यास चौरंगावरती ब्रह्मादिमंडल देवतांचे आवाहन पूजन करून त्यावर वस्त्र घालतात. वस्त्रावर तांदूळ घालून कलश ठेवला जातो कलशामध्ये पाणी, सुपारी, पैसे, दूर्वा, पंचरत्न, आंब्याचा डहाळा (टाळा ) घालून ताम्हना मध्ये वरूण पूजा करून सुवर्णाच्या विष्णू प्रतिमेवरती विष्णू या मुख्यदेवतेचे आवाहन केले जाते. त्याच बरोबर त्र्यंबक, यजमानांच्या जन्मनक्षत्र देवतेचे आवाहन पूजन केले जाते. विष्णू ही देवतेची कृपा लाभावी यासाठी १०८ वेळा जप करून हवनाला प्रारंभ होतो. हवनामध्ये प्रथम ग्रहमंडल देवतांचे हवन केल्यावर मुख्यदेवता विष्णू देवतेसाठी समिधा, तूप, भात/तांदूळ, पायस या चार द्रव्याने १०८ वेळा हवन करून त्र्यंबक या देवतेला तिळाने १००० आहुती देतात. यजमानांच्या आयुष्यवृद्धीसाठी काही मंत्र या ठिकाणी म्हटले जातात. बलीदान, पूर्णाहुती करून यजमान मंडळी यांच्यावरती अभिषेक केला जातो. आशीर्वाद देऊन कार्य पूर्ण करतात. या शांती मध्ये आलेल्या गुरूजींना वस्त्र द्यावे असे सांगितले आहे.
॥ शुभं भवतु ॥