चैत्र महिना –
चैत्र महिना म्हणजे मराठी नववर्षाची सुरुवात होय. या महिन्यामधे येणारे सण – १) गुढीपाडवा. २) चैत्रगौर. प्रथम गुढीपाडवा साडेतीन मुहूर्तापैकी शुभ दिवस आहे. खूप ठिकाणी या मुहूर्तावर वास्तुशांत करतात. परंतु वास्तुशांतीसाठी चैत्र महिना वर्ज्य असल्याने यादिवशी वास्तुशांती करू नये. तरी विधिवत् गणेशपूजन, गृहप्रवेश करून रहायला जाऊ शकतो. दुसर्या मुहूर्तावरती वास्तुशांती अवश्य करावी. काहीवेळा चैत्रगौर बसवताना चैत्रशुद्ध तृतिया या दिवशी अशौच (सुतक इ.) आले असता अशा वेळेला चैत्रकृष्ण तृतियेला चैत्रगौर बसवावी.
वैशाख महिना –
या महिन्यात अक्षय्य तृतिया हा शुभ दिवस आहे. काही जणांना हा दिवस शुभ वाटत नाही. अक्षय्य तृतियेला पितरांचे श्राद्ध, केले जाते म्हणून हा दिवस शुभ मानत नाहीत, परंतु ही समजूत पूर्ण चुकीची आहे. या दिवशी श्राद्ध, तर्पण, दान, जप इ. केल्याने अक्षय्य फ़ल प्राप्त करून देणारा हा शुभ दिवस आहे.
ज्येष्ठ महिना –
या महिन्यात वटपौर्णिमा व मंगळागौरी हे सण येतात. वटपौर्णिमेच्या पूजनासाठी सायंकाळी पौर्णिमा असलेला दिवस घ्यावा. काहीवेळेला दुपारनंतर पौर्णिमा सुरू होते म्हणून सकाळी पूजा करत नाही. पूजनाच्या वेळी पौर्णिमा पाहिजे हा समज चुकीचा आहे. नवविवाहित स्त्रियांचा सण म्हणजे मंगळागौरीची पूजा. या व्रताचे महत्व म्हणजे अखंड सौभाग्य मिळावे म्हणून हे व्रत केले जाते. “जन्मोजन्मी हाच पती मिळावा म्हणून हे व्रत केले जाते” हि समजूत चुकीची आहे. ( गरोदर स्त्री प्रसूत होईपर्यंत वटसावित्री, हरितालिका, मंगळागौरी पूजन करू शकते.)
आषाढ महिना –
या महिन्यापासून चातुर्मास प्रारंभ होतो. चातुर्मासात जे सण, उत्सव आहेत त्याची माहिती पुढे येईलच. चातुर्मासाचे व्रत जे लोक करतात त्यांनी आषाढ शुद्ध द्वादशी पासून किंवा पौर्णिमेपासून प्रारंभ करण्यास हरकत नाही.
श्रावण महिना –
या महिन्यात रक्षाबंधन हा विधी येतो. राखी बांधणे हा लौकिक झाला असल्याने पंचांगात जो दिवस दिला असेल त्या दिवशी कोणत्याही वेळी हा विधी करण्यास हरकत नाही. (यामधे बहीण भाउरायाचे औक्षण करून त्याला राखी बांधते.) मंगळागौरीच्या दिवशी संकष्टी, एकादशी किंवा वाराचा उपवास आल्यास नैवेद्यामध्ये उपवासाला चालणारा पदार्थ करून वाढावा व उपवासकरणार्या वक्तीने प्रसाद म्हणून भक्षण करावा. (या महिन्यात सोमवारी शंकरांची पूजा करतात.)
भाद्रपद महिना-
लहान थोर सर्वांना आवडणारा सण म्हणजे पार्थिव गणेश स्थापना (गणपती) या महिन्यात शुद्ध चतुर्थिला पार्थिव गणेश स्थापना व पूजन केले जाते. पहाटेपासून दुपार होईपर्यंत कोणत्याहीवेळी करण्यास हरकत नाही यासाठी विशिष्ट मुहूर्त नसतो. (गणेश स्थापना पहाटॆ झाली असेल तरिही भोजनाचा नैवेद्य दुपारी १२:३० नंतर दाखवावा. उजव्या सोंडेचा गणपती कडक आणि डाव्या सोंडेचा सौम्य अशी समजूत असणे चुकीचे आहे. ॥भाद्रपद शुद्ध चतुर्थी हा दिवस गणेश स्थापनेसाठी असल्याने काही कारणास्तव जमले नाही तर पुढे गणपती बसवू नये. एक वर्षी लोप झालेला चालेल. पुढच्या वर्षी गणेश स्थापना करण्यास काहिच हरकत नाही. ॥ज्या लोकांकडे १० दिवस गणपती असतात त्यांना काही कारणाने १० दिवस गणपती ठेवणे शक्य नसेल तर एक, दीड, पाच, सात दिवस गणपती ठेऊन विसर्जन करता येते. ॥ ज्यांच्याकडे गौरी गणपती विसर्जन असते त्यांनी कितव्याही दिवशी गौरी विर्सजन आले तरी त्याच दिवशी गौरी गणपती विर्सजन करावे. ॥ घरी गणपती स्थापना झाल्यावर सोयर, सूतक आल्यास लगेच दुसर्याकडून गणपति विर्सजन करावा. ॥ उत्सवात मूर्ती भंग झाल्यास लगेच विर्सजन करावे. त्यानंतर त्या उत्सवात परत गणपति आणून पुजू नये. पुढील वर्षी आणावा. ॥ गणेशाची उत्तरपूजा झाल्यावर विर्सजन करण्याआधी पुन्हा आरती करण्याची जरूरी नाही. ॥ भाद्रपद गौरी. काहीजणांकडे खड्याच्या, सुगडावरती, उभ्या असतात. जसा कुळाचार असेल तशा प्रकारे गौरी पूजन करावे. गौरीपूजन करण्यासाठी कोणीतरी मुखवटे किंवा हात दिले पाहिजेत असे नाही. स्वेच्छेने कधीही गौरीपूजन सुरू करता येते. सुतक आल्याने भाद्रपदातील गौरीपूजन करता आले नाही तर अश्विन महिन्यात राहिलेले गौरीपूजन करतात. परंतु याला शास्त्राधार नाही तसे करू नये.
पितृपक्ष-
एक वर्ष पूर्ण झाल्यावरती म्हणजे वर्षश्राद्ध झाले की येणार्या पितृपक्षात महालय, भरणीश्राद्ध, अविधवा नवमी श्राद्ध करावे. पितृपक्षात पितरांसाठी श्राद्ध इ. करावे असे सांगितले आहे. म्हणून इतर कामे, नविन व्यवहार, वाहन घेणे, शेतीची कामे इ. करू नये हे चुकीचे आहे. श्राद्धकर्म अशुभ मानणे चुकीचे आहे. आपल्या पूर्वज्यांच्या तुष्टी करिता श्राद्ध इ. करावे. पितृपक्षात पक्षश्राद्ध करणे शक्य झाले नाही तर पुढे महालय समाप्ती पर्यंत कोणत्याही दिवशी पक्षश्राद्ध करता येते. (महालय समाप्ती पंचांगात दिलेली असते.)
आश्विन महिन-
या महिन्यात नवरात्रीचा सण येतो. नवरात्र बसल्यानंतर काही ठिकाणी इतर देवतांची पूजा करीत नाहीत हे योग्य नाही. प्रकृती नुसार रोज उपवास करणे अशक्य असेल तर अष्टमीला उपवास करावा. नवरात्र बसल्यानंतर सुतक आले असता सप्तशती पाठ बंद करावे. सुतक संपल्यावरती राहिलेले पाठ पूर्ण करावे. नवरात्राचे उपवास करता येतात. मात्र देवांची पूजा, माळ, दिवा शेजार्याकडून करून घ्यावे. नवरात्र म्हणजे अश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी पर्यंत केले जाणारे धार्मिक कार्ये. अशावेळी तिथीच्या क्षय किंवा वृद्धी मुळे नवरात्र ८ ते १० दिवसांचे होउ शकते.
कार्तिक महिना-
या महिन्यात दिवाळी हा सण असतो. त्याच्या अंतर्गत भाउबीज असते.
मार्गशीर्ष महिना-
या महिन्यात दत्तजयंती हा उत्सव असतो. दत्तजयंती काही ठिकाणी चतुर्दशी किंवा पौर्णिमेला साजरी करतात. प्रथेप्रमाणे हा उत्सव करावा. या उत्सवात दत्तजयंतीच्या आधी सात दिवस गुरूचरित्राचे पारायण करतात.
पौष महिना-
पौष महिन्यात मंगलकार्ये करू नयेत असा समज आहे तो चुकीचा आहे. फ़क्त विवाहासाठी मकरसंक्राती नंतरचा महिना घ्यावा असे आहे. परंतु वास्तुशांती, बारसे, डोहाळेजेवण, साखरपुडा इ. सर्व मंगलकार्यासाठी पौष महिना शुभ आहे.
माघ महिना-
माघीगणेश उत्सव या महिन्यात होतो. गणेशजयंतीचा उपवास संपूर्ण दिवस असतो इतर उपवासा प्रमाणे रात्री हा उपवास सोडू नये.
फ़ाल्गुन महिना-
फ़ाल्गुन महिन्यात मंगलकार्ये न करण्याची प्रथा आहे परंतु याला शास्त्राधार नाही.
||शुभं भवतु||