भाद्रपद महिन्यात आपण जो गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करतो. त्याच दिवशी भाद्रपद शुक्लचतुर्थी या दिवशी मध्यान्हकाळी श्री सिद्धिविनायक व्रत करावे. या व्रताचे विषेश फल सांगितले आहे. या जन्मामध्ये पुत्र, धन, विद्या, यश, आयुष्य, आरोग्य प्राप्त होऊन मनातील सर्व शुभ कामना पूर्ण होण्यासाठी श्री सिद्धिविनायक व्रत करावे. *आपण जी पार्थीव (मातीची) मूर्तीची स्थापना करतो त्याच मूर्तीची पूजा करावी. सर्वात प्रथम पूजेचा संकल्प करून कलश, शंख, घंटा, समई यांची पूजा करावी. त्यानंतर गणेशाच्यामूर्तीची विधिवत् प्राणप्रतिष्ठा करावी. प्राणपतिष्ठा करून पूजा करावी पंचामृत इ. पूजा झाल्यावर अत्तर इ. सुवासिक द्रव्याने देवाला स्नान घालावे. सुवासिक फुले, हार इ. वाहून झाल्याव्यर अंगपूजा, पत्रीपूजा करावी. धूप, दीप ओवाळून मोदक इ. देवाला नैवेद्य अर्पण करावा. आंबा, फणस, खजूर, केळी, नारळ इ. फळे देवाला अर्पण करावीत. गणेशाच्या एकवीस नावाने एकवीस दुर्वांकुर वहावे. आरती मंत्रपुष्प म्हणून पूजा पूर्ण करावी. ब्राह्मण पूजन करून त्याला दहा मोदकांचे वायन द्यावे. गणेश प्रतिमा दान करावी. सर्व इच्छा पूर्ण करणारी स्कंदपुराणातील नंदिकेश्वर व सनत्कुमार यांच्या संवादातून आलेली कथा भक्तिभावाने श्रवण करावी. अशा प्रकारे श्रीसिद्धिविनायक व्रत पूर्ण होते.
॥ शुभं भवतु ॥