भाद्रपद महिन्यामध्ये शुद्ध चतुर्दशी या दिवशी दुपारी अनंताची पूजा करावी.
चौदा वर्षे हे व्रत करून त्याचे उद्यापन करावे. काही लोक कायम दरवर्षी हे व्रत करतात. या व्रतामध्ये इतरपूजेप्रमाणे उत्तरपूजन नसते. फक्त मागील वर्षीचा पूजेत ठेवलेला अनंत पूजेच्या शेवटी अक्षता टाकून विसर्जन करावा. नवा अनंत ( या वर्षी घेतलेला ) वर्षभर पूजेसाठी देवघरात ठेवावा.
या पूजेमध्ये यजमान प्रथम संकल्प करतात. माझ्या सगळ्या कुटुंबाला आयु: , आरोग्य प्राप्त व्हावे तसेच धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे चार पुरूषार्थ सिद्यर्थं अनंत ही देवतेची कृपा होण्यासाठी आज षोडशोपचार पूजा करतो असा संकल्प करून गणेश स्मरण केले जाते. नित्य देवपूजे प्रमाणे कलश, शंख, घंटा, दीप पूजन करून अनंताचे ध्यान केले जाते. पंचामृती पूजा करून नामपूजा केली जाते. दर्भाचा शेष ( नाग ) करून त्याची पूजा करून अनंताची पूजा होते त्या दोर्याला गाठ मारतात त्याची सुद्धा पूजा आहे. या पूजेमध्ये चौदा आवरण पूजा, विविध पत्र पूजा, पुष्प पूजा, एकशेआठ नावांनी पूजा हे सर्व विषय या व्रतामध्ये सांगितले आहेत. हेअ सर्व करून पूजा पूर्ण केली जाते. गुरूजींना वायन दान देऊन सर्व पापांचे क्षालन करणारी कथा भक्तिने श्रवण करून कार्यक्रम संपूर्ण होतो.
॥ शुभं भवतु ॥